Saturday, September 16, 2006

सहज आठवल आणि पटकन लिहावस वाटल. खर म्हणजे कुठलीही गोष्ट टाकून देण्याचा माझा स्वभाव नाही. प्रत्येक गोष्टीमागे आठवणी दडलेल्या असतात. मग अगदी तो लहानपणी कुठेतरी वाळूत सापडलेला साधा दगड पण का कुणास ठाऊक तो शंकराच्या पिंडीसारखा दिसतो म्हणून जपून ठेवलेला असतो. कुठेतरी सापडलेला भला मोठा अभ्रक अजूनही पुस्तकात एका खूणेच्या पानाशी ठेवलेला असतो. नाशिकला आमची ट्रीप ८ वीत गेली असताना तिथे रस्त्यावरती मिळलेली छोटीशी पण हाताने काढलेली मांजराची चित्र अजून मी जपून ठेवलेली आहेत. मद्रासला जाऊन आल्यावर तिथे मिळालेल्या शिंपल्यांच्या लहान लहान वस्तू अजूनही माझ्या कपाटात गर्दी करून आहेत. बरेचदा विचार येतो मनात की किती अडगळ ठेवली आहे मी अगदी उचलून त्या वस्तु बाजूला काढून ठेवते पण का कुणास ठाऊक मला ते फ़ेकवत नाही. माझी अगदी लहानपणाची बाहूली तिचे केस गेले आहेत, डोळा खिळखिळा झाला आहे पण मी अजूनही तिला जपून ठेवली आहे. तिच्या सहवासातले इतके सुरेख क्षण मी तिला फ़ेकून देउन विसरूच शकत नाही. माझी लहानपणापासून जमवलेली पुस्तक एका लोखंडी ट्रंक मध्ये जपून ठेवलेली आहेत. प्रत्येक पुस्तका मागे काही ना काही गोष्ट आहे. बाबा मुंबैला गेले म्हणून आणलेली काही पुस्तक तर कधी आजोबांनी आणून दिलेली. कधी समोरच्या गल्लीत भरलेल्या पुस्तकाच्या प्रदर्शनातली पुस्तक तर कधी वाढदिवसाला सुरेख वेश्टणात बांधून मिळालेली पुस्तक.
प्रत्येक पुस्तकावर माझ्या बाबांच्या देखण्या हस्ताक्षरात माझ नाव. इतक सगळ असताना ते फ़ेकून दिलच जात नाही. कधीतरी हळूवार हात फ़िरवून ते सोनेरी दिवस परत आठवायचे फ़क्त.

लहानपणापासून मी माणसांच्या बाबतीत देखिल तशीच आहे. आमच्याकडे मावशी, आजी आजोबा, ,मामा मामी कोणीपण रहायला आले की मला आठवते किती पण रात्र झालेली असो मी उठून बसायचे त्यांच्याबरोबर तो अवेळचा चहा घेताना अस मन कस आनंदाने फ़ुलून जायच. आता पुढचे काही दिवस आपण घरात इतकी सगळी लोक हा आनंद खूप मोठा असायचा. पण मग तो जाण्याचा दिवस येऊन ठेपला की माझी भुणभुण सुरु व्हायची.
आजी थांब ना ग अजून थोडे दिवस
की आजी म्हणायची " अग नको गेल पाहिजे तिथे घर एकट असेल. " मला घर एकट असण्याची कंसेप्ट कधी कळलीच नाही.
" पण मी नाही का ग एकटी मग. "
मग आजी समजूत घालायची
" अग तुझी शाळा सुरु होईल मग कशाला माझी आठवण येईल तुला. "
पण मला ते पटायचेच नाही. नाही पण तु उद्या नको जाऊस फ़क्त एक दिवस थांब फ़क्त एक दिवस. कधी माझ ते रडण बघून आजी एखादा दिवस वाढवायची. आणि मग कोण आनंद व्हायचा. तो एक दिवसच इतका छान वाटायचा. जणू आखी सुट्टी त्या दिवसात जगून घेतल्यासारखा.
दुसर्‍या दिवशी आजी निघाली की जरा शांत असायचे. पण मिठी मारून अजून एक दिवस थांब ना म्हणायचे मी सोडत नसे..
हे दोन क्षण दोन दिवस खूप महत्वाचे असतात. आयुष्य कधी कधी त्या दोन दिवसात जगून गेल्यासारखे.
कधीतरी कोणाला तरी थांब ना अजून थोडावेळ सांगता याव आणी समोरच्याने ते ऐकाव, आणि कधी कधी कोणीतरी थांब ना अजून थोडा वेळ सांगणार पण असाव. असा छोटासाच वेडेपणा करण्यात पण सुख असत.
पुढे मग रुममेट्स आल्या, ६ ६ महिने एकत्र रहायच आणि परत वेगळ व्हायच तस सहजपणे जमू लागल. पण अजूनही प्रत्येकवेळी मी सोडून चालले की माझ्या डोळ्यात पाणी यायच रहात नाही. वाटत की त्या घराने एकदा तरी म्हणाव थांब ग अग अजून २ दिवस आणि मी देखिल ते ऐकाव. पण तस होत नाही. पण नक्की सांगते जरका अस झाल तर माझा पाय अडखळल्याशिवाय रहाणार नाही.

Thursday, September 14, 2006

तुझ्या माझ्या संगतीचा योग
आपल्या कुंडलीत कुठून लाभला?
ही नारींगी संध्याकाळ
ही सुखाची सफ़र
हा झकास बेत कसा जमला?
या संगतीची तर्‍हाच वेगळी
हिला कसलीच बंधन नाहीत
संकेत, अपेक्षा
आणा, शपथा
असे कुठलेच उपचार नाहीत
क्षीतीजावरची ही रंगत पाहिलीस?
तशीच ही संगतही सहज खुलते
तितकीच उत्कट
तितकीच खुळी
तशीच मनात फ़ुलत रहाते
कदाचीत एक्खाद्या खुळावल्या क्षणी
भेटतीलही ओठ
जुळतीलही हात
किंवा कदाचित
कळणारही नाही
केंव्हा संपून गेली वाट
कुणी सांगाव पुढच्याच क्षणी
पुसलही जाईल हे वेड गीत
निरोपाच्या वळणावर
दरवळत ठेऊन
एक खोलसा उसासा
एक हलकस स्मित


सुधीर मोघे