Friday, October 13, 2006

पाश

" अनिरुद्ध घेतलस सगळ बरोबर? " वैदेहीने स्टीलचा डबा त्याच्या बॅगेत कोंबलाच.
" अग आई नको आता बास. सामान कोंबता आल तितक कोंबल आहे. आता अजून कोंबल तर सामानासकट मला बाहेर फ़ेकतील "
" एका लाडूच्या डब्याने काय रे तुझ सामान जड होत? ती जाड जाड पुस्तक बाहेर काढ. तिथे मिळत नाहीत का पुस्तक? " वैदेहीने सात्विक संतापाने उत्तर दिले. अनिरुद्ध हसला. त्याने आपला हात वैदेहीच्या खांद्यावर टाकत म्हंटले

" आई गं आता जास्त नर्व्हस होऊ नकोस नाहीतर माझा पाय बाहेर पडणार नाही. "

वैदेहीचे डोळे पाणावले. मुलगा तसा गेली ८ वर्ष परदेशी होता. खर तर आता सवय व्हायला हवी होती.
पण आताशा वैदेही उगीचच जास्त हळवी झाली होती. अवीचा पहिला हार्ट ऍटॅक येऊन गेल्यापासून तिचा जीव
एव्हढ्या तेव्हढ्या गोष्टींनी घाबरा घुबरा व्हायचा. पण मुलगा आणि नवरा दोघेही आपल्या चिंता उडवून
लावतात तिला सवयीने माहिती झाले होतेच. काही न बोलता वैदेहीने ताटं मांडायला सुरुवात केली.

पानावर बसताना अनिरुद्ध आणि अवी ह्यांची नेहमीसारखी चेष्टा मस्करी चालूच होती. वैदेही मात्र न राहवून भुतकाळात, भविष्यकाळात दोघांना ओढून नेत होती.

" अनि अरे लग्नाच पण बघूयात आता तुझ्या. मला सुन आली की मी सुटेन आता "
" अगं पण तुला सुन आली तरी हा पठ्ठ्या तिला तिकडे अमेरीकेत नेणार मग तुला काय उपयोग तिचा? "
वैदेही चिडली " अवी तुला काय वाटत सुन मला माझ्यासाठी हवी आहे? तिकडे एकटा रहातो हा. कोणी नको का सुख
दु : ख वाटायाला जवळच? "
" अगं आई मला आहेत की गर्ल्फ़्रेंड्स चिकार. भरपुर सुख दु : ख वाटतो मी त्यांच्याशी "
अनीच्या उत्तरावर उडालेल्या दोघांच्या हास्याच्या फ़वार्‍यात बिचार्‍या वैदेहीला लागलेला ठसका ती विसरली.

मग अनिरुद्धची बॅग पुर्ण भरणे, त्याने नमस्कार केल्यावर पोटाशी धरून देवाला मनापासून आठवणे.
हातावर दह्याची कवडी टेकवून सुखात रहा बाबा म्हणणे वगैरे मधे वैदेही सगळच विसरून गेली.

अवीने अनिरुद्धला कडकडून मिठी मारल्यावर मात्र तिला हुंदका आवरता आला नाही.

" आई ग " अनिरुद्ध चा आवाज दाटून आला होता.
" अरे नाही रे. मी ठीक आहे. गेले ८ वर्ष तु तिथे आहेस. आम्ही तुझ्याकडे २ दा येऊन गेलोय. मला खर म्हणजे सवय व्हायला हवी. पण माझ ठीक आहे रे. अवीसाठी म्हणून मला थोड वाटत. "
" वैदु अग मला काय झालय. मी आता पुर्ण बरा आहे. आणि हे काय वेड्यासारख. अनिरुद्ध काय कायमचा चालला आहे का? गेल्या गेल्या फ़ोन कर रे मला. आणि हो भरपूर रीसर्च कर. आणि नाव कमाव. "
अनिरुद्धच्या पाठीवर थाप मारत अवी म्हणाला. वैदेहीने डोळे पुसले.

खरतर रीटायर्ड झाल्यापासून तिला जास्तच चिंता करायची सवय जडली होती वाटत अवीच्या भाषेत. नोकरी करत होतो तेच चांगल होत. मुंबईला यायची काही गरज नाही म्हणून अनिरुद्धने आधीच बजावल होत. आणि ते खर पण होत. मध्यरात्रीच्या फ़्लाईटसाठी झोपेच खोबर केल तर आपली असीडीटी वाढेल आणि अवी सुद्धा थकेल दिसतच तर होत. म्हणून वैदेही अनिरुद्ध दिसेनासा होईपर्यत गॅलरीत उभी राहिली. अवीनेच मग मागून येऊन कधीतरी तिला मिठीत घेतले. त्याच्या छातीअर डोक टेकवून वैदेहीचा इतका वेळ धरून ठेवलेला बांध फ़ुटला.

" बघ ह्यासाठी म्हणत होते. एकुलता एक मुलगा नको. अजून 2-3 तरी मुलं असायला हवी होती ना रे आपल्याला "
तिचे डोळे पुसत अवी हसला
" वेडाबाई आणि सगळीच इकडे तिकडे गेली असती तर काय ग "
" हो रे पण आपण किती दिवसाचे सोबती. आपण गेल्यावर अनिरुद्धला इतके जवळचे कोण असणार रे "
" का त्याची बायको असेल. मुलं असतील "
खर होत त्याच म्हणण पण का कुणास ठाऊक वैदेही आज अस्वस्थ होती. रात्री येऊ नका उगीच जागरण होईल म्हणाला अनिरुद्ध तरी झोप कुठली यायला. वैदेही हातात एक पुस्तक घेऊन बसली आणी अवी देखिल टीव्ही ऑन करून
बसला. शेवटी अनिरुद्धचा फ़ोन आला. परत परत निट रहा, काळजी घे, बाहेरच अरबट चरबट खाऊ नकोस. पोचल्या पोचल्या फ़ोन कर वगैरे परत परत सांगताना जाणवल वैदेहीला आपण म्हातारे झालोय. किती काळजी करतोय अवीकडे बघत वैदेही हसली. अवीने तिच्या पाठीवर थोपटले.

वैधेहीने अवीचा हात हातात घेतला.
" आठवत का रे अवी आपण नविन नविन लग्न झाल्यावर इथे आलो रहायला. तेंव्हा अनिरुद्ध? फ़क्त २ वर्षांचा होता "
" हो आई काकांची इच्छा नव्हती आपण इथे याव अशी "
" खरय रे. तेंव्हा आपण आपल्या नादात होतो आपण विचरच नाही केला आई काकांचा. बिचार्‍यांनी इतक मोठ घर बांधल होत औरंगाबादला. "

अवी काहीच बोलला नाही. वैदेही मात्र भुतकाळात शिरली. आई कित्तीदा म्हणायच्या
" वैदेही अग इथेच रहा तुम्ही दोघ. आपल घर कित्तीतरी मोठ आहे "
" अहो आई घराचा थोडीच प्रश्ण आहे. पण अवीला तिकडे खुप मोठा चांस मिळतोय आणि मला देखिल तिकडे जास्त स्कोप आहे "
" हो ग पण आता मंज़ु लग्न करून जाईल. सिद्धार्थ तर आधीच हैद्राबादला स्थायीक झाला आहे. वाटत होत तुम्ही तरी इथे रहाल. अवीचे बाबा काही म्हणत नाहीत ग. पण त्यांना देखिल वाटतच ना मुलगा हातात रहावा "
वैदेही गप्प बसली होती. पण करीयर, अनिरुद्ध सगळ्यांच्याच हिताचे होते की पुण्याला स्थायीक व्हावे.
अवीचा फ़िरतीचा जॉब. मुंबई ला बरेचदा जावी यावे करायला लागे. आई काकांची कित्तीदा आपल्याकडे
येऊन रहा म्हणून विनवणी केली तरी पण ते कधी कायमचे येऊन राहिलेच नाहीत. त्यांचही बरोबरच होतं
म्हणा वर्षानुवर्ष स्वप्ने बघून बांधलेल मोठ घर आणि जमवलेली नाती, मैत्रीची नतेवाईकांची. अस
सगळ सोडून देऊन येण तस पण अवघडच होतं त्यांच्यासाठी

" अवी आपण आई काकांशी अस वागलो म्हणून का रे आपल्याला पण म्हातारपणी एकट रहावे लागतय? "
वैदेहीने बोचणारा प्रश्ण विचारलाच
" वेडी का ग तु? अग नियमच आहे हा निसर्गाचा. पुढ्ची पिढी मोठ उड्डाण करणारच. "

वैदेहीचे डोळे परत भरून आले. खरय अवीच. आपण मारे हिंदु धर्म वगैरे म्हणतो पण अस ज्यात त्यात
गुंतवून ठेवण्याचा स्वभाव कुठून आला. कर्मण्ये वाधीकारस्ते म्हणत मोठे झालो तरी पण पाय गुंतवला की
मग पटकन सोडवूनही घेता येत नाही. नुसता गुंता तयार होतो. क्शणोक्षणी भुतकाळात शिरून
भविष्याची चिंता करण कधी सोडणार आपण. अवी मात्र प्रत्येक गोष्टीत असून नसल्यासारखाच
भावनेने अनावर कधी होणार नाही की आनंदाने उत्तेजीत कधी होणार नाही. बरेचदा राग जरी
आला तरी कधी कधी त्याच्या स्वभावाचा हेवाच वाटतो. बर असत हे अस कशातच न गुंतुन पडण
जगण सोप्प होत.
वैदेहीने सुस्कारा सोडला.


" हं चहा घेतोस का अवी? " वैदेही न रहावून उठली.
अवी नाही म्हणणार नाही माहितच होत तिला. चहा हा एकच त्याचा वीक्पोईंट. लग्न ठरल्यावर
अवीने तिला सांगीतले होते. तुला पुरणपोळी जमली नाही कधी तरी चालेल पण चहा मात्र मस्त शिकून घे.
पण तिला त्याला हवा तसा चहा कधी जमलाच नाही. चहा अवीच करायचा बरेचदा.
" मी करते " हसत वैदेही पुढे म्हणाली. अवी देखिल हसला.
चहा तयार करून ती परत अवीपाशी येऊन बसली. खिडकीतून चंद्र डोकावत होता. वैदेहीने खिडकीवरचा
पडदा बाजूला सारला.

" चंद्र सुंदर दिसतोय ना.. "
" हं परवाच पोर्णिमा झाली ना. तु शाल ओढून घे वैदु. थंडी बाधते तुला "
वैदेही हसली. अवीचा हात आपल्या भोअवती लपेटून घेत तिने चहाचा एक घोट घेतला
" अवी पुर्वी आपण तरसायचो ना अस एकट आपल्याला कधी वेळच मिळत नाही सरख हे नाहीतर ते "
" खरय थांब " म्हणत अवी उठला. ग्रामोफ़ोनवर त्याने कुमार गंधर्व लावला.
हट्टाने चोर बाजारात शोधून शोधून बापलेकाने हा ग्रामोफ़ोन आणला होता. तबकड्यांच्या खरखरीत गाणं ऐकायची मजा वेगळीच. CD, MP3 आल्या तरी हे तबकड्या गोळा करण्याच वेड दोघांच गेल नाही.

" अवी आपल्या एखादी मुलगी हवी होती ना? "
" हो आवडली असती मला मुलगी. तुझ्यासारखी. अस सगळ्यात जीव अडकवून ठेवणारी "
" नको अशी माझ्यासारखी नको मग तिला खूप अवघड झाल असत. तुझ्याचसारखी हवी होती
कशाताच गुंतवून न पडणारी. "
क्षणभर शांतता पसरली. अनीरुद्धच विमान आता उडल असेल. वैदेहीला परत एकदा भरून आल्यासारख झाल
" अवी एक ऐकशील का रे माझ? "
" बोल ना "
" एक वचन दे मला. माझ्या आधी तु नाही जायचस. मला खुप त्रास होईल रे "
" हमम "
" मी नाही रे तुझ्यासारखी. मला नाही जमायच तुझ्याशिवय रहाण, तु गुंतवला नसलास जीव माझ्यात तरी माझा खुप गुंतला आहे. मला आधी जाऊदेत "
वैदेहीला हुंदका फ़ुटला.
अवीने तिला हळुच मिठीत घेतले. तिच्या पाठीवर तो थोपटत राहिला.
" कधी शिकणार तु let go करायला. आला क्षण मुठीत पकडून ठेवायचा वेडेपणा कधी सोडणार. मी जरी आधी गेलो तरी तुला काही कमी पडणार नाही. तु रडारड केलीस तरी मी विल वगैरे बनवलच ना आणि तुला कितीही आवड नसली तरी आपल्या फ़ायननंशीलबद्दल तुझ्या कानीकपाळी उगीच का ओरडत असतो मी? "
" अवी नको ना रे. किती कोरडा आहेस. सारख काय रे पैसे पैसे. काही नको मला पैसे.. तुला वचन द्यायला काय होत "
" बर घे वचन, " अवी हसत म्हणाला.
" वैदु हातात असत का ग हे अस आपल्या. वेडाबाई तुझी काळजी मी नाही तर अजून कोण घेणार " अवी थोडा हळवा होऊन म्हणाला. त्याच्या डोळ्यात बघताना का कूणास ठाऊक वैदेहीला जाणवले की आपल्या हे क्षण धरून ठेवायच्या स्वभावाने आपल्या आधी पटकन जाता सुद्धा यायचे नाही. ज्यात त्यात गुंतलेला जीव मोकळा करणे अवी सारख आपल्याला जमायचच नाही.
मरणाला देखिल आपण कदाचित थोपवून धरु.एकटेपणाच्या भितीने शहारलेली वैदेही कधी नव्हे ते गुंतलेले पाश मोकळे करायचा प्रयत्न करत होती.