Friday, October 13, 2006

पाश

" अनिरुद्ध घेतलस सगळ बरोबर? " वैदेहीने स्टीलचा डबा त्याच्या बॅगेत कोंबलाच.
" अग आई नको आता बास. सामान कोंबता आल तितक कोंबल आहे. आता अजून कोंबल तर सामानासकट मला बाहेर फ़ेकतील "
" एका लाडूच्या डब्याने काय रे तुझ सामान जड होत? ती जाड जाड पुस्तक बाहेर काढ. तिथे मिळत नाहीत का पुस्तक? " वैदेहीने सात्विक संतापाने उत्तर दिले. अनिरुद्ध हसला. त्याने आपला हात वैदेहीच्या खांद्यावर टाकत म्हंटले

" आई गं आता जास्त नर्व्हस होऊ नकोस नाहीतर माझा पाय बाहेर पडणार नाही. "

वैदेहीचे डोळे पाणावले. मुलगा तसा गेली ८ वर्ष परदेशी होता. खर तर आता सवय व्हायला हवी होती.
पण आताशा वैदेही उगीचच जास्त हळवी झाली होती. अवीचा पहिला हार्ट ऍटॅक येऊन गेल्यापासून तिचा जीव
एव्हढ्या तेव्हढ्या गोष्टींनी घाबरा घुबरा व्हायचा. पण मुलगा आणि नवरा दोघेही आपल्या चिंता उडवून
लावतात तिला सवयीने माहिती झाले होतेच. काही न बोलता वैदेहीने ताटं मांडायला सुरुवात केली.

पानावर बसताना अनिरुद्ध आणि अवी ह्यांची नेहमीसारखी चेष्टा मस्करी चालूच होती. वैदेही मात्र न राहवून भुतकाळात, भविष्यकाळात दोघांना ओढून नेत होती.

" अनि अरे लग्नाच पण बघूयात आता तुझ्या. मला सुन आली की मी सुटेन आता "
" अगं पण तुला सुन आली तरी हा पठ्ठ्या तिला तिकडे अमेरीकेत नेणार मग तुला काय उपयोग तिचा? "
वैदेही चिडली " अवी तुला काय वाटत सुन मला माझ्यासाठी हवी आहे? तिकडे एकटा रहातो हा. कोणी नको का सुख
दु : ख वाटायाला जवळच? "
" अगं आई मला आहेत की गर्ल्फ़्रेंड्स चिकार. भरपुर सुख दु : ख वाटतो मी त्यांच्याशी "
अनीच्या उत्तरावर उडालेल्या दोघांच्या हास्याच्या फ़वार्‍यात बिचार्‍या वैदेहीला लागलेला ठसका ती विसरली.

मग अनिरुद्धची बॅग पुर्ण भरणे, त्याने नमस्कार केल्यावर पोटाशी धरून देवाला मनापासून आठवणे.
हातावर दह्याची कवडी टेकवून सुखात रहा बाबा म्हणणे वगैरे मधे वैदेही सगळच विसरून गेली.

अवीने अनिरुद्धला कडकडून मिठी मारल्यावर मात्र तिला हुंदका आवरता आला नाही.

" आई ग " अनिरुद्ध चा आवाज दाटून आला होता.
" अरे नाही रे. मी ठीक आहे. गेले ८ वर्ष तु तिथे आहेस. आम्ही तुझ्याकडे २ दा येऊन गेलोय. मला खर म्हणजे सवय व्हायला हवी. पण माझ ठीक आहे रे. अवीसाठी म्हणून मला थोड वाटत. "
" वैदु अग मला काय झालय. मी आता पुर्ण बरा आहे. आणि हे काय वेड्यासारख. अनिरुद्ध काय कायमचा चालला आहे का? गेल्या गेल्या फ़ोन कर रे मला. आणि हो भरपूर रीसर्च कर. आणि नाव कमाव. "
अनिरुद्धच्या पाठीवर थाप मारत अवी म्हणाला. वैदेहीने डोळे पुसले.

खरतर रीटायर्ड झाल्यापासून तिला जास्तच चिंता करायची सवय जडली होती वाटत अवीच्या भाषेत. नोकरी करत होतो तेच चांगल होत. मुंबईला यायची काही गरज नाही म्हणून अनिरुद्धने आधीच बजावल होत. आणि ते खर पण होत. मध्यरात्रीच्या फ़्लाईटसाठी झोपेच खोबर केल तर आपली असीडीटी वाढेल आणि अवी सुद्धा थकेल दिसतच तर होत. म्हणून वैदेही अनिरुद्ध दिसेनासा होईपर्यत गॅलरीत उभी राहिली. अवीनेच मग मागून येऊन कधीतरी तिला मिठीत घेतले. त्याच्या छातीअर डोक टेकवून वैदेहीचा इतका वेळ धरून ठेवलेला बांध फ़ुटला.

" बघ ह्यासाठी म्हणत होते. एकुलता एक मुलगा नको. अजून 2-3 तरी मुलं असायला हवी होती ना रे आपल्याला "
तिचे डोळे पुसत अवी हसला
" वेडाबाई आणि सगळीच इकडे तिकडे गेली असती तर काय ग "
" हो रे पण आपण किती दिवसाचे सोबती. आपण गेल्यावर अनिरुद्धला इतके जवळचे कोण असणार रे "
" का त्याची बायको असेल. मुलं असतील "
खर होत त्याच म्हणण पण का कुणास ठाऊक वैदेही आज अस्वस्थ होती. रात्री येऊ नका उगीच जागरण होईल म्हणाला अनिरुद्ध तरी झोप कुठली यायला. वैदेही हातात एक पुस्तक घेऊन बसली आणी अवी देखिल टीव्ही ऑन करून
बसला. शेवटी अनिरुद्धचा फ़ोन आला. परत परत निट रहा, काळजी घे, बाहेरच अरबट चरबट खाऊ नकोस. पोचल्या पोचल्या फ़ोन कर वगैरे परत परत सांगताना जाणवल वैदेहीला आपण म्हातारे झालोय. किती काळजी करतोय अवीकडे बघत वैदेही हसली. अवीने तिच्या पाठीवर थोपटले.

वैधेहीने अवीचा हात हातात घेतला.
" आठवत का रे अवी आपण नविन नविन लग्न झाल्यावर इथे आलो रहायला. तेंव्हा अनिरुद्ध? फ़क्त २ वर्षांचा होता "
" हो आई काकांची इच्छा नव्हती आपण इथे याव अशी "
" खरय रे. तेंव्हा आपण आपल्या नादात होतो आपण विचरच नाही केला आई काकांचा. बिचार्‍यांनी इतक मोठ घर बांधल होत औरंगाबादला. "

अवी काहीच बोलला नाही. वैदेही मात्र भुतकाळात शिरली. आई कित्तीदा म्हणायच्या
" वैदेही अग इथेच रहा तुम्ही दोघ. आपल घर कित्तीतरी मोठ आहे "
" अहो आई घराचा थोडीच प्रश्ण आहे. पण अवीला तिकडे खुप मोठा चांस मिळतोय आणि मला देखिल तिकडे जास्त स्कोप आहे "
" हो ग पण आता मंज़ु लग्न करून जाईल. सिद्धार्थ तर आधीच हैद्राबादला स्थायीक झाला आहे. वाटत होत तुम्ही तरी इथे रहाल. अवीचे बाबा काही म्हणत नाहीत ग. पण त्यांना देखिल वाटतच ना मुलगा हातात रहावा "
वैदेही गप्प बसली होती. पण करीयर, अनिरुद्ध सगळ्यांच्याच हिताचे होते की पुण्याला स्थायीक व्हावे.
अवीचा फ़िरतीचा जॉब. मुंबई ला बरेचदा जावी यावे करायला लागे. आई काकांची कित्तीदा आपल्याकडे
येऊन रहा म्हणून विनवणी केली तरी पण ते कधी कायमचे येऊन राहिलेच नाहीत. त्यांचही बरोबरच होतं
म्हणा वर्षानुवर्ष स्वप्ने बघून बांधलेल मोठ घर आणि जमवलेली नाती, मैत्रीची नतेवाईकांची. अस
सगळ सोडून देऊन येण तस पण अवघडच होतं त्यांच्यासाठी

" अवी आपण आई काकांशी अस वागलो म्हणून का रे आपल्याला पण म्हातारपणी एकट रहावे लागतय? "
वैदेहीने बोचणारा प्रश्ण विचारलाच
" वेडी का ग तु? अग नियमच आहे हा निसर्गाचा. पुढ्ची पिढी मोठ उड्डाण करणारच. "

वैदेहीचे डोळे परत भरून आले. खरय अवीच. आपण मारे हिंदु धर्म वगैरे म्हणतो पण अस ज्यात त्यात
गुंतवून ठेवण्याचा स्वभाव कुठून आला. कर्मण्ये वाधीकारस्ते म्हणत मोठे झालो तरी पण पाय गुंतवला की
मग पटकन सोडवूनही घेता येत नाही. नुसता गुंता तयार होतो. क्शणोक्षणी भुतकाळात शिरून
भविष्याची चिंता करण कधी सोडणार आपण. अवी मात्र प्रत्येक गोष्टीत असून नसल्यासारखाच
भावनेने अनावर कधी होणार नाही की आनंदाने उत्तेजीत कधी होणार नाही. बरेचदा राग जरी
आला तरी कधी कधी त्याच्या स्वभावाचा हेवाच वाटतो. बर असत हे अस कशातच न गुंतुन पडण
जगण सोप्प होत.
वैदेहीने सुस्कारा सोडला.


" हं चहा घेतोस का अवी? " वैदेही न रहावून उठली.
अवी नाही म्हणणार नाही माहितच होत तिला. चहा हा एकच त्याचा वीक्पोईंट. लग्न ठरल्यावर
अवीने तिला सांगीतले होते. तुला पुरणपोळी जमली नाही कधी तरी चालेल पण चहा मात्र मस्त शिकून घे.
पण तिला त्याला हवा तसा चहा कधी जमलाच नाही. चहा अवीच करायचा बरेचदा.
" मी करते " हसत वैदेही पुढे म्हणाली. अवी देखिल हसला.
चहा तयार करून ती परत अवीपाशी येऊन बसली. खिडकीतून चंद्र डोकावत होता. वैदेहीने खिडकीवरचा
पडदा बाजूला सारला.

" चंद्र सुंदर दिसतोय ना.. "
" हं परवाच पोर्णिमा झाली ना. तु शाल ओढून घे वैदु. थंडी बाधते तुला "
वैदेही हसली. अवीचा हात आपल्या भोअवती लपेटून घेत तिने चहाचा एक घोट घेतला
" अवी पुर्वी आपण तरसायचो ना अस एकट आपल्याला कधी वेळच मिळत नाही सरख हे नाहीतर ते "
" खरय थांब " म्हणत अवी उठला. ग्रामोफ़ोनवर त्याने कुमार गंधर्व लावला.
हट्टाने चोर बाजारात शोधून शोधून बापलेकाने हा ग्रामोफ़ोन आणला होता. तबकड्यांच्या खरखरीत गाणं ऐकायची मजा वेगळीच. CD, MP3 आल्या तरी हे तबकड्या गोळा करण्याच वेड दोघांच गेल नाही.

" अवी आपल्या एखादी मुलगी हवी होती ना? "
" हो आवडली असती मला मुलगी. तुझ्यासारखी. अस सगळ्यात जीव अडकवून ठेवणारी "
" नको अशी माझ्यासारखी नको मग तिला खूप अवघड झाल असत. तुझ्याचसारखी हवी होती
कशाताच गुंतवून न पडणारी. "
क्षणभर शांतता पसरली. अनीरुद्धच विमान आता उडल असेल. वैदेहीला परत एकदा भरून आल्यासारख झाल
" अवी एक ऐकशील का रे माझ? "
" बोल ना "
" एक वचन दे मला. माझ्या आधी तु नाही जायचस. मला खुप त्रास होईल रे "
" हमम "
" मी नाही रे तुझ्यासारखी. मला नाही जमायच तुझ्याशिवय रहाण, तु गुंतवला नसलास जीव माझ्यात तरी माझा खुप गुंतला आहे. मला आधी जाऊदेत "
वैदेहीला हुंदका फ़ुटला.
अवीने तिला हळुच मिठीत घेतले. तिच्या पाठीवर तो थोपटत राहिला.
" कधी शिकणार तु let go करायला. आला क्षण मुठीत पकडून ठेवायचा वेडेपणा कधी सोडणार. मी जरी आधी गेलो तरी तुला काही कमी पडणार नाही. तु रडारड केलीस तरी मी विल वगैरे बनवलच ना आणि तुला कितीही आवड नसली तरी आपल्या फ़ायननंशीलबद्दल तुझ्या कानीकपाळी उगीच का ओरडत असतो मी? "
" अवी नको ना रे. किती कोरडा आहेस. सारख काय रे पैसे पैसे. काही नको मला पैसे.. तुला वचन द्यायला काय होत "
" बर घे वचन, " अवी हसत म्हणाला.
" वैदु हातात असत का ग हे अस आपल्या. वेडाबाई तुझी काळजी मी नाही तर अजून कोण घेणार " अवी थोडा हळवा होऊन म्हणाला. त्याच्या डोळ्यात बघताना का कूणास ठाऊक वैदेहीला जाणवले की आपल्या हे क्षण धरून ठेवायच्या स्वभावाने आपल्या आधी पटकन जाता सुद्धा यायचे नाही. ज्यात त्यात गुंतलेला जीव मोकळा करणे अवी सारख आपल्याला जमायचच नाही.
मरणाला देखिल आपण कदाचित थोपवून धरु.एकटेपणाच्या भितीने शहारलेली वैदेही कधी नव्हे ते गुंतलेले पाश मोकळे करायचा प्रयत्न करत होती.

Saturday, September 16, 2006

सहज आठवल आणि पटकन लिहावस वाटल. खर म्हणजे कुठलीही गोष्ट टाकून देण्याचा माझा स्वभाव नाही. प्रत्येक गोष्टीमागे आठवणी दडलेल्या असतात. मग अगदी तो लहानपणी कुठेतरी वाळूत सापडलेला साधा दगड पण का कुणास ठाऊक तो शंकराच्या पिंडीसारखा दिसतो म्हणून जपून ठेवलेला असतो. कुठेतरी सापडलेला भला मोठा अभ्रक अजूनही पुस्तकात एका खूणेच्या पानाशी ठेवलेला असतो. नाशिकला आमची ट्रीप ८ वीत गेली असताना तिथे रस्त्यावरती मिळलेली छोटीशी पण हाताने काढलेली मांजराची चित्र अजून मी जपून ठेवलेली आहेत. मद्रासला जाऊन आल्यावर तिथे मिळालेल्या शिंपल्यांच्या लहान लहान वस्तू अजूनही माझ्या कपाटात गर्दी करून आहेत. बरेचदा विचार येतो मनात की किती अडगळ ठेवली आहे मी अगदी उचलून त्या वस्तु बाजूला काढून ठेवते पण का कुणास ठाऊक मला ते फ़ेकवत नाही. माझी अगदी लहानपणाची बाहूली तिचे केस गेले आहेत, डोळा खिळखिळा झाला आहे पण मी अजूनही तिला जपून ठेवली आहे. तिच्या सहवासातले इतके सुरेख क्षण मी तिला फ़ेकून देउन विसरूच शकत नाही. माझी लहानपणापासून जमवलेली पुस्तक एका लोखंडी ट्रंक मध्ये जपून ठेवलेली आहेत. प्रत्येक पुस्तका मागे काही ना काही गोष्ट आहे. बाबा मुंबैला गेले म्हणून आणलेली काही पुस्तक तर कधी आजोबांनी आणून दिलेली. कधी समोरच्या गल्लीत भरलेल्या पुस्तकाच्या प्रदर्शनातली पुस्तक तर कधी वाढदिवसाला सुरेख वेश्टणात बांधून मिळालेली पुस्तक.
प्रत्येक पुस्तकावर माझ्या बाबांच्या देखण्या हस्ताक्षरात माझ नाव. इतक सगळ असताना ते फ़ेकून दिलच जात नाही. कधीतरी हळूवार हात फ़िरवून ते सोनेरी दिवस परत आठवायचे फ़क्त.

लहानपणापासून मी माणसांच्या बाबतीत देखिल तशीच आहे. आमच्याकडे मावशी, आजी आजोबा, ,मामा मामी कोणीपण रहायला आले की मला आठवते किती पण रात्र झालेली असो मी उठून बसायचे त्यांच्याबरोबर तो अवेळचा चहा घेताना अस मन कस आनंदाने फ़ुलून जायच. आता पुढचे काही दिवस आपण घरात इतकी सगळी लोक हा आनंद खूप मोठा असायचा. पण मग तो जाण्याचा दिवस येऊन ठेपला की माझी भुणभुण सुरु व्हायची.
आजी थांब ना ग अजून थोडे दिवस
की आजी म्हणायची " अग नको गेल पाहिजे तिथे घर एकट असेल. " मला घर एकट असण्याची कंसेप्ट कधी कळलीच नाही.
" पण मी नाही का ग एकटी मग. "
मग आजी समजूत घालायची
" अग तुझी शाळा सुरु होईल मग कशाला माझी आठवण येईल तुला. "
पण मला ते पटायचेच नाही. नाही पण तु उद्या नको जाऊस फ़क्त एक दिवस थांब फ़क्त एक दिवस. कधी माझ ते रडण बघून आजी एखादा दिवस वाढवायची. आणि मग कोण आनंद व्हायचा. तो एक दिवसच इतका छान वाटायचा. जणू आखी सुट्टी त्या दिवसात जगून घेतल्यासारखा.
दुसर्‍या दिवशी आजी निघाली की जरा शांत असायचे. पण मिठी मारून अजून एक दिवस थांब ना म्हणायचे मी सोडत नसे..
हे दोन क्षण दोन दिवस खूप महत्वाचे असतात. आयुष्य कधी कधी त्या दोन दिवसात जगून गेल्यासारखे.
कधीतरी कोणाला तरी थांब ना अजून थोडावेळ सांगता याव आणी समोरच्याने ते ऐकाव, आणि कधी कधी कोणीतरी थांब ना अजून थोडा वेळ सांगणार पण असाव. असा छोटासाच वेडेपणा करण्यात पण सुख असत.
पुढे मग रुममेट्स आल्या, ६ ६ महिने एकत्र रहायच आणि परत वेगळ व्हायच तस सहजपणे जमू लागल. पण अजूनही प्रत्येकवेळी मी सोडून चालले की माझ्या डोळ्यात पाणी यायच रहात नाही. वाटत की त्या घराने एकदा तरी म्हणाव थांब ग अग अजून २ दिवस आणि मी देखिल ते ऐकाव. पण तस होत नाही. पण नक्की सांगते जरका अस झाल तर माझा पाय अडखळल्याशिवाय रहाणार नाही.

Thursday, September 14, 2006

तुझ्या माझ्या संगतीचा योग
आपल्या कुंडलीत कुठून लाभला?
ही नारींगी संध्याकाळ
ही सुखाची सफ़र
हा झकास बेत कसा जमला?
या संगतीची तर्‍हाच वेगळी
हिला कसलीच बंधन नाहीत
संकेत, अपेक्षा
आणा, शपथा
असे कुठलेच उपचार नाहीत
क्षीतीजावरची ही रंगत पाहिलीस?
तशीच ही संगतही सहज खुलते
तितकीच उत्कट
तितकीच खुळी
तशीच मनात फ़ुलत रहाते
कदाचीत एक्खाद्या खुळावल्या क्षणी
भेटतीलही ओठ
जुळतीलही हात
किंवा कदाचित
कळणारही नाही
केंव्हा संपून गेली वाट
कुणी सांगाव पुढच्याच क्षणी
पुसलही जाईल हे वेड गीत
निरोपाच्या वळणावर
दरवळत ठेऊन
एक खोलसा उसासा
एक हलकस स्मित


सुधीर मोघे

Wednesday, August 30, 2006

आजकाल वृत्तपत्रातल्या बातम्या, टीव्हीवरच्या बातम्या किंवा काहीही पाहिजे तसा मनावर ठसा उमटवत नाहीत. बरेचदा शंका येते की अरे आपल्या भावना तर बोथट झाल्या नाहीत ना! बाबरी मशीद पाडली होती तेंव्हा मी रात्र रडून काढली होती. का ते आज समजत नाही किंवा तेंव्हा फ़ारशी नक्की काय चालू आहे हे देखिल कळत नव्हते पण हे चुक आहे अस का केल इतकेच माझे प्रश्ण होते. पोलिटीक्स हा माझा प्रांत कधीच नव्हता. फ़क्त त्या प्रसंगानंतर झालेली जाळपोळ, दंगल बघून मला झोप येत नसे. सारखी भिती वाटत होती आता काय होणार. मी तशी फ़ार मोठी पण नव्हते. शाळकरी मुलगीच होते. पण ह्या घटनेचा पडसाद खोलवर जाऊन रुजला. नंतर मुंबईचे ब्लास्ट्स, लातुरजवळचा भुकंप. सगळ्या घटना खोलवर कुठेतरी रुजल्या होत्या पण त्याची धार बोथट होत गेली. परवा न्युयोर्क च्या हल्ल्यामधे मला आठवते की कोणीतरी सांगीतले अग तु अमेरीकेमध्ये जाणार आहेस ना हे बघ काय चालू आहे. घरचे सगळे मला इथे पाठवायच्या विरोधात होते. अर्थात मी काही संत नाही मला देखिल भिती वाटतच होती. त्या मृत्यु पावलेल्या लोकांपेक्षा मला माझ्या जीवाची भिती जास्त वाटत होती. संवेदना अशा बोथट का होतात. कदाचित वय वाढल्याचा परिणाम? आज देखिल वर्तमान पत्र उघडून बघितल्यावर निम्म्या पानावर हेच दिसेल दंगे, जाळपोळ अपघात. पुर्वी मी तशा बातम्या चुकून देखिल वाचायला जात नसे. अर्थात आज देखिल नाहीच पण आलेच वाचनात तर ते खोलवर जात देखिल नाही. हे अस चालणारच म्हणत, हळहळत मी वर्तमानपत्र बंद करते.

हे अस वयाने वाढणे खरोखरच शाप आहे का. कुठेतरी हे समजुतदार झालेल मन शेवटपर्यंत पाय ओढत रहात. समजुतदार ,मच्युअर शब्द तसा चांगला आहे. जरा आपल्यालाच बर वाटत. :) रात्री अचानक मुड येतो कधीतरी, वाफ़ाळती कॊफ़ी घेऊन जुनी गाणी ऐकत चांदण्यात एकटेच बसायचे. खर तर पुर्वी कितीदा केल असेन मी. पण आता अरे सकाळी जाग नाही आली तर हे होईल, ऒफ़ीसमध्ये काय माहित आज सकाळी सकाळी काय मीटींग आहे. वगैरे वगैरे :) एखाद्या रविवारी गाडी काढून नुसतेच लांबवर जाऊन यायचा बरेचदा विचार मनात येतो पण इतक्या गोष्टी कबूल करून ठेवलेल्या असतात की सगळ संपवून निघे निघेपर्यंत जाऊदेत पुढच्या रविवारी बघू म्हणेपर्यंत मन समजूतदार बनत.

पण कधीतरी हा आपला आपल्यावरचा ठाम विश्वास गळून पडतो. शक्यच नाही अस म्हणत अचानक अशा गोष्टी हातून होतात की त्या माझ्यातल्याच स्वप्नाळू मुलीला थबकून सांगावस वाटत जपून.. काय करते आहेस हे :) संवेदनांची धार बोथट होते आहे अस वाटतानाच हलकेशा फ़ुंकरीने उमटलेली थरथर कशामुळे समजेनासे होते.
कुठेतरी ते मन खोलवर दडून बसलेल असत बहूतेक, आलेल्या अनुभातून, प्रखर सत्यामूळे घाबरून आडोशाला. नकळत कधीतरी ते जाणवत आणि मग आपणच आपल्याला नव्याने विचारावस वाटत काय आहे ना ओळख :)

Friday, August 25, 2006

First sunset?

मी काढलेला आणि पहिल्यांदाच चांगला निघालेला सनसेटचा फ़ोटो... मला तरी आवडला. मीच खुष आहे माझ्यावर सध्या

Thursday, August 17, 2006

कशासाठी

खर म्हणजे ब्लोग लिहिणे तसे अवघडच. कधी डायरी लिहायला जमली नाही, मला नाही वाटत मी असे हे विचार लिहू शकेन. लिहिले तरी कोणाला वाचा म्हणून सांगण्याचा पण धीर होणार नाही. खर तर मनातले विचार असे लिहून काढणे आणि ते सगळे वाचणार ही कल्पना थोडी माझ्यासाठी अवघड आहे. कदाचित मी शाळेत वगैरे असताना डायरी लिहायचा प्रयत्न केला होता तेंव्हा तिला अगदी कडी कुलुपाअत ठेऊन मगच मला हायस वाटायच. बर कोणाच्या हातात पडली तर काय म्हणून अगदी सगळे विचार पण लिहायचे नाहीत. मग उपयोग तरी काय त्या डायरीचा :)आशा आहे की कदाचित अस इथे होणार नाही. हा ब्लॊग खर तर कशासाठी मला माहित नाही. मी इथे काय लिहिणार ते पण माहित नाही. सध्या तरी मी इतर ठिकाणी टाकलेले पोस्ट कॊपी पेस्ट करते आहे. बाकी पुढच पुढे.

Monday, August 07, 2006

शामसुंदर, मदनमोहन

कालच हरे रामा हरे कृष्णाच्या सभासदाने मला देसी होटेलच्या बाहेर गाठून थोडेफ़ार स्वत : च्या काही मोहिमा, देवळाविषयी थोडेफ़ार आणी मुख्य म्हणजे भगवद गितेचे अत्यंत आकर्षक पुस्तक समोर करून सांगीतले, आम्ही डोनेशन घेतो पण तुमच्या मर्जीने, त्या बदल्यात हे पुस्तक तुमचे. मी हळूच पुस्तक उघडून बघितले तर आत संस्कृत मध्ये श्लोक आणि त्याचा अर्थ ईंग्रजीमध्ये. मी खर तर अर्थ मराठीत असलेले पुस्तक prefer केले असते. पण पुस्तकावरच कृष्ण अर्ज़ुनाचे आकर्षक चित्र असल्याने मला ते पुस्तक खाली ठेववेना. बरोबर असलेली मैत्रीण चल ना, हे लोक इथे बरेचदा असतात वगैरे सांगत होती. मी पण नाखूषीनेच पुस्तक टेबलावर परत ठेवले. खर तर आम्च्या घरी पुण्यात गितेचे संस्कृत ते मराठी असे पुस्तक आहे. आणि देशात जाऊन कधी पण ते आणता येईल वगैरे logical विचार मनात येतच होते. पण त्या पुस्तकाचा मोह पण सोडवत नव्हता. शेवटी मी निर्धार करून म्हंटले, नकोय मला आहे माझ्या घरी भारतात पुस्तक. ती नुसतीच हसली. तिने ते पुस्तक परत माझ्या हातात दिले. आणि म्हंटले घेऊन जा हे पुस्तक looks like you love it . ते खोटे थोडीच होते. मी नकळतच ते परत हातात घेतले. शेवटी मग ते मी घेतलेच. मदत किती दिली वगिअरे ते प्रश्ण गौण होते. निघताना ती विक्रेती मुलगी अवर्जून म्हणाली आमच देऊळ आहे इथे san jose मध्ये नकी ये. मी घरी आल्यावर ते पुस्तक थोडेफ़ार चाळले. खर तर त्यातली चित्रे बघितली. गुळगुळीत कव्हरवरच गितोपदेश करतानाच कृष्ण अर्ज़ुनाच चित्र डोळे भरून बघितले. कृष्ण माझा अत्यंत आवडता देव. किंबहूना गणपतीपेक्षा पण जास्त आवडता. माझ्या आईच्या वडिलांनी त्या काळी कर्नाटकातल्या एका मुलीशी (म्हणजे माझी आजी ) शी प्रेमविवाह केला होता. आजी कानडी असल्याने आजीकडे कृष्णाची अनेक पुस्तक कानडी भाषेत असायची. मी दर मे महिन्यात आजोळी गेले की ती सगळी पुस्तक बाहेर काढून ती देखणी चित्रे बघायची. खाली काय लिहिलय हे कळत नसे पण चित्रावरून गोष्टी सहज समजत. बाळकृष्णाने, किशोर वयातला कृष्णाने मला इतकी भुरळ पाडली होती की मी आजोबांकडे देवघरातला बाळकृष्ण मला द्या म्हणून लकडा लावला. शेवटी आजोबांनी मला एक लहानशी चिनी मातीची बाळकृष्णाची मुर्ती आणून दिली. दररोज सकाळ, दुपार संध्याकाळ मनात येईल तेंव्हा त्या कृष्णाला दगडाचे देवघर बांधून त्याची मिळतील ती फ़ुल वाहून पुजा करायची किंव्हा उरलेला वेळ तिला फ़्रोॅकच्या खिशात ठेऊन हिंडायचे. झोपताना पण तो माझ्या मुठीत ठेऊन मगच मला झोप लागायची. माझ्या मामाचे लग्न ठरले तेंव्हा मामी पहिल्यांदा घरात आली तेंव्हा तिला माझा बाळकृष्ण आवडला म्हणून आजोबांनी मला तो द्यायला लावला. त्याचा मला भयंकर राग आला होता की तुला दुसरा आणून देतो म्हंटल्यावर मी नकोय मला दुसरा तो थोडीच त्या कऊष्णासारखा असणारे म्हणत मी पुर्ण दिवस रडण्यात घालवलेला आठवतो आहे. मी ९वीच्या मे महिन्यात टायफ़ोईडने आजारी होते तेंव्हा बाकी काहीच करायला नसायचे म्हणून आजोबांच्या लायब्ररीतून अनेक कृष्णाची पुस्तके काढून वाचली होती. त्यातले एक पुस्तक ( मी नाव लिहून ठेवले नाही ह्याचा इतका पश्चाताप होतोय मला ) अतिशय सुंदर होते. कृष्णाच्या युद्धातल्या भुमिकेवर आणि त्यानंतरच्या त्याच्या आयूष्यावर ते पुस्तक होते. त्या काळात प्रथमच कृष्णाच्या सांदीपनी रुशींनंतरच्या आणी नंतरची रुक्मिणी स्वयंवर आणि सुदामा भेट अशा तुरळक गोष्टी सोडून बाकीचे कृश्णाचे जीवन समजले. कृष्णाचा मृत्यू कसा झाला हे देखिल तेंव्हाच समजले. हळू हळू मी मोठी होत गेले तशी तशी बाळकृष्णापेक्षा, राधा कृष्णापेक्षा तरूण मध्यमवयीन कृष्णाचे म्हणजे महायुद्धाततल्या त्याच्या भुमिकेचे आकर्षण वाढत गेले. कृष्णासारखा राजकारणी आणि अत्यंत हुषार माणूस / देव सापडणे मुश्किल. दिसायला तर तो मोहक होताच पण त्याचे बोलणे देखिल अत्यंत गोड असणार. तरीच नुसत्या स्त्रियाच काय पण कोणीही त्याच्यावर मोहित होत असणार. आणि त्याला आपल्यातल्या ह्या सामर्थ्याची पुरेपुर जाणिव असणार. म्हणूनच तर तो कुंतीला घेऊन युद्धाच्या आदल्या दिवशी कर्णाला भेटायला गेला. त्याला जाणिव असणार की कदाचित कर्णासमोर अर्जूनाचा टिकाव लागणे अवघड आहे. मला महित नाही युद्ध, किंवा त्याने पांडवांची मदत फ़क्त ते नात्यातले होते म्हणून केली की त्याला अजून काही साध्य करायचे होते. पण त्याने जे काही केले ते नक्कीच विचारपुर्वक आणि योजना आखून केले असणार. युगंधर वाचून काढले तेंव्हा नाही म्हणायला थोडी निराशाच झाली. का कुणास ठाऊक पुस्तक चांगलेच आहे पण कृष्णाभोवती जे अद्भुततेचे वलय आहे ते त्या पुस्तकात जाणवले नाही त्यामुळे ते मला तितकेसे आवडले नाही. अर्थात हे माझे मत. मी कधी काळी गितेचे काही अध्याय बाबा सांगतात म्हणून पाठ केले होते. पण कृष्ण मला इतका आवडतो म्हणून एकदा पुर्ण गिता वाचून समजून घ्यायची आहे. बाकी राहता राहिला माझ्या आवडीचा प्रश्ण तो तर तो बाळपणीचा खोडकर, राधेबरोबरचा खट्याळ कृष्णच मला जास्त भावेल. त्याचे अजून एक भावलेले रुप म्हणजे द्रोपदीचा सखा. असा सखा मिळवायला द्रोपदीने नक्कीच कोणतेतरी जबरदस्त पुण्य केले असणार. गेले काही दिवस हरे रामा हरे कृष्णाच्या मंदीरात जायचे जायचे मनात आहे पण योग जुळून येत नाहीये. कदाचित कृष्णाच्या मानात नसेल मी त्याला आत्ता भेटावे असे. बघू कधी बोलवतोय तो मला

डीस्नेलॅंड the happiest place on earth

डीस्नेलंडला ५० वर्ष पुर्ण झाली. त्या निमित्तने ऐकलेले, बघीतलेले आणि वाचलेले थोडेसे मला डीस्नेलॅंड ला परत ( चौथ्यांदा खर तर ) जाण्याची संधी मिळाली. कोणीही मला डीस्नेलॅंडला येणार का विचारल्यावर नाही म्हणता आले नाही आजपर्यंत. ह्यावेळचा आमचा कार्यक्रम एकदम झकास होता. ३ दिवस फ़क्त disneyland . एका दिवसात घाई घाईने बघण्यासाठी Disneyland खर तर नाहीच. Walt Disney ह्या माणसाच्या प्रेमात तर मी खूप आधीपासून पडले आहे. पण disneyland च्या ईतीहासाबद्दल्बद्दल फ़ारसे माहित नव्हते. आता disneyland ला ५० वर्ष पुर्ण झाल्याने त्याबद्दल बरच काही वाचायला आणि बघायला मिळाले. 1955 मधे walt disney ने हे park लोकांसाठि उघडले पण त्या आधी कितीतरी वर्ष तो ह्या पार्कचा विचार करत होता. आपल्या भावाबरोबर आणी मुलांबरोबर चर्चा करत होता. बे अरेया मधे रहणार्‍याना oakland चे fairyland माहित असेल. त्याचा walt disney वर खुप प्रभाव होता. अर्थात तोपर्यंत त्याने काढलेले मुव्हीज गाजले होते. मीकी, मिनी भरपुर लोकप्रिय झाले होते. लोकांची असंख्य पत्र walt disney ला येत होती. अम्हाला तुमचा स्टुडीओ बघायचा आहे, पण वोॅल्टच्या डोक्यात काहीतरी वेगळेच होते. फ़क्त मुलांसाठी आणि family साठी काहीच नाही हे walt ने ओळखले होते. त्याच्या डोक्यात सुरुवातीला स्टुडीओच्या बाहेर एक १० एकर चे पार्क काढयाचे असे होते. पण world war 2 मुळे ते जमले नाही आणी प्रत्यक्षात आकारास आले ते १६५ अकर १७ मिलीयन चे अनहीम मधले disneyland .ऽर्थात disneyland was too expensive Walt once said "I could never convince the financiers that Disneyland was feasible, because dreams offer too little collateral." म्हणुन walt ने Television चा सहारा घेतला. आणि ABC वर नविन शो तयार झाला Walt Disney's Disneyland वोॅल्ट च्या स्वप्नसृष्टीतून डीस्नेलॅंड हळु हळू आकारास येऊ लागले. पण प्रत्यक्षात फ़क्त एका वर्षात counstruction पुर्ण झाले आणि 18 june 1955 मध्ये हे पार्क लोकांसाठी खुले झाले. वोॅल्टने प्रत्येक लहानसहान गोष्टीत लक्ष पुरवले होते. Main street, Adventureland, Fantasy land, Frontier land, Tomorrowland .. अशक्यातले शक्य करायचे कसब फ़ार थोड्यांमधे असते. स्वपन सगळेच जण बघतात पण ती प्रत्यक्षात आणणारा walt disney एखादाच असतो. Main street USA एक जुन्या काळातल्या शहरातल्या main street चे रुपक आहे. गप्प गोष्टी करत त्या main street वर हातात हात घालून युगुले चालताना, लहान मुले दंगा करताना, घोडागाडीच्या ये, जा. रस्त्यावर बुड्ढीके बाल वगैरे विकणार्‍या गाड्या आणि तिथल्या लोकांचे ते वेष बघीतले की अगदी व्हिक्टोरियन काळात गेल्यासारखे वाटते. त्या Main street वरच Walt DIsneyche pvt apartment होते. खुपदा तो एकटाच रात्री तिथे जाऊन रहायचा आणि अजून काय आपण ह्या park मध्ये सुविधा आणू शकतो ह्याचा विचार करायचा. Fantasy Land Walt च्याच शब्दात "What youngster. . .has not dreamed of flying with Peter Pan over moonlit London, or tumbling into Alice's nonsensical Wonderland? In Fantasyland, these classic stories of everyone's youth have become realities for youngsters-of all ages-to participate in." त्या किल्ल्यातून आत शिरले की आपण वय विसरतो. Alice च्या त्या कपबशा, स्नो व्हाईटची ती राईड आणि सगळ्यात द्रुष्ट लावणारे असते ती तिथल्या चिमुरड्यांची गर्दी. घोळदार झगे आणी डोक्यावर तो चमचमणारा मुकुट घालून त्या सोनेरी केसांच्या निळ्या डोळ्यांच्या बाहूल्या आणि पीटर पॅनचा हिरवागार वेष घालून किंवा राजपुत्रासारखा मुकुट घालून तलवार फ़िरवणारे ते बाहूले. खंत वाटते की त्या वयात Disneyland बघाय्ला मिळाले नाही. आणि ही मुल किती lucky त्याचा हेवादेखिल. Tomorrowland भविष्य काळात वेध घेऊन त्या काळात फ़िरवून आणण्याचे walt चे स्वप्न. पण हे तयार करताना walt ला बरेच झगडावे लागले. He said that "right when we do Tommorrowland, it will be out dated." आणि किती खर आहे ते. पार्क हळू हळू उभे राहिले. walt चे अथक परिश्रम आणि त्याचे स्वप्न पुर्ण झाले. opening day ला 6000 आमंत्रण मेल केली गेली पण प्रत्यक्षात 28000 लोक पार्क मधे होते. पहिला माणूस ( त्याच नाव आठवत नाही ) ज्याने तिकीट विकत घेतले त्याच्याबरोबर walt ने फ़ोटो काढून घेतला आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला lifetime pass दिला गेला. opening day was complete disaster एकतर लोकांची अनपेक्षीत गर्दी, अचानक आलेली heatwave आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा.. दुसर्‍या दिवशी walt ने परत एकदा वार्ताहरांना आणि काही आमंत्रीतांना बोलावले आणि एक जंगी पार्टी दिली. Walt आपल्या कामात अगदी चोख होता तसेच त्याने इतरांना कधी दिरंगाई करू दिली नाही. उदाहरण म्हणजे Tom sawyer Ride जेंव्हा ही राईड पुर्ण झाली तेंव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या ideas नक्की समजल्या नाहीत. walt ने परत एकदा ते plans तयार केले आणि ती पुर्ण राईड modify केली. Walt च्या छोट्या छोट्या गोष्टी आजही आपल्याला पार्क मध्ये दिसतात. जसे कोणत्याही प्रकारचा च्युईंग गम पार्क मध्ये विकले जात नाही. आपल्या बुटांना नक्की काय चिकटले बघण्यात आलेल्या पाहूण्यांचा वेळ नक्कीच त्याला खर्च करायचा नव्हता. कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल तिथे मिळत नाही. असे म्हणतात की प्रत्येक राईड तयार होताना walt गुढग्यावर बसून निरिक्षण करायचा. आप्ल्या पार्कात आलेल्या छोट्यातल्या छोट्या पाहूण्याला ते नक्की कसे दिसेल ह्याचाच तो प्रयत्न. Disneyland मध्ये गेल्यावर त्या पारकची ऍड खरीच आहे असे वाटते. The happiest place on earth आणि किती खर आहे ते. अल्लदीनच्या त्या जादुच्याच्या कार्पेटवर बसल्यावर किंवा disney parade च्या वेळी mickey ला बघून चेहर्‍यावर उमटलेले हसू cinderella, snowwhite, aril डिस्ने च्या त्या princesses सगळच भुल पाडणार.. पण सगळ्यात लक्षात राहतात ते तिथल्या चिमुरड्यांच्या तोंडावर ओसंडुन वहाणारा आनंद. मिनीला मिठी मारून आनंदाने गदगदुन रडणारी लहानशी लहानशी परी. किंवा mickey ने हात मिळवला म्हणून गर्वाने बघणारा एखादा चिमुरडा. इतकेच. परत येणार का disneyland ला असा खोचक प्रष्ण मला आल्यावर विचारलाच अनेकांनी. पण मी तितक्याच आनंदाने हो म्हणेन अशी मला दाट शंका आहे