Wednesday, August 30, 2006

आजकाल वृत्तपत्रातल्या बातम्या, टीव्हीवरच्या बातम्या किंवा काहीही पाहिजे तसा मनावर ठसा उमटवत नाहीत. बरेचदा शंका येते की अरे आपल्या भावना तर बोथट झाल्या नाहीत ना! बाबरी मशीद पाडली होती तेंव्हा मी रात्र रडून काढली होती. का ते आज समजत नाही किंवा तेंव्हा फ़ारशी नक्की काय चालू आहे हे देखिल कळत नव्हते पण हे चुक आहे अस का केल इतकेच माझे प्रश्ण होते. पोलिटीक्स हा माझा प्रांत कधीच नव्हता. फ़क्त त्या प्रसंगानंतर झालेली जाळपोळ, दंगल बघून मला झोप येत नसे. सारखी भिती वाटत होती आता काय होणार. मी तशी फ़ार मोठी पण नव्हते. शाळकरी मुलगीच होते. पण ह्या घटनेचा पडसाद खोलवर जाऊन रुजला. नंतर मुंबईचे ब्लास्ट्स, लातुरजवळचा भुकंप. सगळ्या घटना खोलवर कुठेतरी रुजल्या होत्या पण त्याची धार बोथट होत गेली. परवा न्युयोर्क च्या हल्ल्यामधे मला आठवते की कोणीतरी सांगीतले अग तु अमेरीकेमध्ये जाणार आहेस ना हे बघ काय चालू आहे. घरचे सगळे मला इथे पाठवायच्या विरोधात होते. अर्थात मी काही संत नाही मला देखिल भिती वाटतच होती. त्या मृत्यु पावलेल्या लोकांपेक्षा मला माझ्या जीवाची भिती जास्त वाटत होती. संवेदना अशा बोथट का होतात. कदाचित वय वाढल्याचा परिणाम? आज देखिल वर्तमान पत्र उघडून बघितल्यावर निम्म्या पानावर हेच दिसेल दंगे, जाळपोळ अपघात. पुर्वी मी तशा बातम्या चुकून देखिल वाचायला जात नसे. अर्थात आज देखिल नाहीच पण आलेच वाचनात तर ते खोलवर जात देखिल नाही. हे अस चालणारच म्हणत, हळहळत मी वर्तमानपत्र बंद करते.

हे अस वयाने वाढणे खरोखरच शाप आहे का. कुठेतरी हे समजुतदार झालेल मन शेवटपर्यंत पाय ओढत रहात. समजुतदार ,मच्युअर शब्द तसा चांगला आहे. जरा आपल्यालाच बर वाटत. :) रात्री अचानक मुड येतो कधीतरी, वाफ़ाळती कॊफ़ी घेऊन जुनी गाणी ऐकत चांदण्यात एकटेच बसायचे. खर तर पुर्वी कितीदा केल असेन मी. पण आता अरे सकाळी जाग नाही आली तर हे होईल, ऒफ़ीसमध्ये काय माहित आज सकाळी सकाळी काय मीटींग आहे. वगैरे वगैरे :) एखाद्या रविवारी गाडी काढून नुसतेच लांबवर जाऊन यायचा बरेचदा विचार मनात येतो पण इतक्या गोष्टी कबूल करून ठेवलेल्या असतात की सगळ संपवून निघे निघेपर्यंत जाऊदेत पुढच्या रविवारी बघू म्हणेपर्यंत मन समजूतदार बनत.

पण कधीतरी हा आपला आपल्यावरचा ठाम विश्वास गळून पडतो. शक्यच नाही अस म्हणत अचानक अशा गोष्टी हातून होतात की त्या माझ्यातल्याच स्वप्नाळू मुलीला थबकून सांगावस वाटत जपून.. काय करते आहेस हे :) संवेदनांची धार बोथट होते आहे अस वाटतानाच हलकेशा फ़ुंकरीने उमटलेली थरथर कशामुळे समजेनासे होते.
कुठेतरी ते मन खोलवर दडून बसलेल असत बहूतेक, आलेल्या अनुभातून, प्रखर सत्यामूळे घाबरून आडोशाला. नकळत कधीतरी ते जाणवत आणि मग आपणच आपल्याला नव्याने विचारावस वाटत काय आहे ना ओळख :)

2 comments:

Sumedha said...

रचना, छान लिहीलंयस, पटलं! मला बोरकरांची कविता आठवली:

http://aapula-samwad.blogspot.com/2006/03/blog-post_10.html

Abhay said...

You have a nice blog here. Keep blogging :)